भुताने झपाटणे म्हणजे काय ?
About This Course
विजया सहावीत होती. तिच्या सहामाही परीक्षेच्या जरा आधीची ही गोष्ट.
एके दिवशी लगबगीने शाळेला जात असताना पिंपळाच्या झाडाखाली ती चक्कर येऊन पडली. शरीर लाकडासारखे कडक झाले. थोड्या वेळाने ती घाबरल्यासारखे करू लागली. सगळ्यांनी तिला उचलून घरी नेले. घरी गेल्यावर ती हातवारे करू लागली. विचित्र आवाजात अस्पष्ट बोलू लागली. ‘पांढरे कपडे घातलेली एक बाई मला हाका मारीत आहे, ती मला नेणार आहे,’ असे तिच्या बोलण्यात वारंवार येत होते.
घरातल्या आणि शेजारच्या लोकांना वाटले पिंपळावरच्या भुताने हिला झपाटले. उतारे, अंगारे-धुपारे, नवस करूनदेखील मुलगी मधूनमधून तशीच वागायची. अखेर त्या मुलीला मनोविकारतज्ञाकडे नेण्यात आले. तिला वेगळे घेऊन तिच्याशी अनेक वेळा शांतपणे बोलल्यावर तज्ञांच्या लक्षात आले की या मुलीवर खूप ताण आहे. अभ्यासात तिला फारसा रस नाही. घरच्यांची इच्छा तिने खूप शिकावी अशी आहे परंतु शाळेतले तिला नीट समजत नाही. परीक्षा जवळ आल्यावर तिच्या मनावरचा ताण वाढला. मला परीक्षेची भीती वाटते असे घरी सांगितले असते तर घरचे रागावले असते. या ताणाचे रूपांतर पिंपळावरच्या भुताने झपाटण्यात झाले. तिच्याशी आणि घरच्यांशी बोलून या ताणातून मार्ग काढल्यावर हळूहळू अंगात भूत येऊन बेशुद्ध बसणे आणि बडबडणे बंद झाले.