वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?
About This Course
वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपण एका शालेय मुलांनी केलेल्या प्रयोगाची माहिती घेऊ.
एकदा एका शाळेतील मुलांनी स्वत: एक प्रयोग करण्याचे ठरवले. पावसाळ्याच्या सुरुवातीला फुलपाखरे पानाच्या मागील बाजूस अंडी घालतात. अंड्यांचे पुंजके असतात. अशी पांढरी, पिवळी, रुपेरी, सोनेरी अंडी मुलांनी अनेकदा पहिली होती. काही दिवसांनी त्या अंड्यातून अळ्या बाहेर आल्या. ज्या ज्या पानावर अळी दिसेल ते पान विद्यार्थ्यांनी देठापासून तोडले आणि ते अळीसहित एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवले. त्याच झाडाचे पाने दररोज अळीला खाऊ घातली. ताजी पाने समोर ठेवताच अळी त्यावर चढुन त्याला फस्त करीत होती. मुलांनी अळीची विष्टा दररोज काढून टाकून बॉक्स स्वच्छ ठेवला. एक दिवस मात्र अळीने पाने खाणे बंद केले, आणि ती सुस्त झाली, तिची दोन्ही टोके एकत्र येऊन तिने शरीराची गुंडाळी केली आणि त्या अळीचा कोष बनला. कोष बॉक्सला चिकटून बसला. मुले रोज कोषाचे निरीक्षण करत होती. जवळ जवळ एक आठवड्यानी एक एक कोष फोडून सुंदर फुलपाखरे बाहेर पडू लागली. त्याचे पंख सुरुवातीला ओलसर असल्यामुळे गुंडाळलेले होते. नंतर फुलपाखराने पंख हलविते, ज्यामुळे ओलसर पंख सुकले आणि हळूहळू पसरले. मुले आनंदली आणि त्यांनी खोक्यातून फुलपाखरे शाळेत आणली. प्रार्थनेच्या वेळी सर्वाना दाखवून ती आकाशात सोडून दिली. एकप्रकारे निसर्गाचे देणे निसर्गाला सुपूर्द केले.